*करवाढ रद्द न झाल्यास मोठे आंदोलन, काँग्रेसचा इशारा
नगरपालिकेची हुकुमशाहीकडे वाटचाल – संजय खाडे
झरी : वणी नगरपालिकेच्या मालमत्ता करवाढीविरोधात काँग्रेसने जनतेच्या वतीने जोरदार आवाज उठवला आहे. सोमवार, दि. 22 सप्टेंबर रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक देत करवाढ मागे घेण्याबाबत निवेदन सादर केले. काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात वणी शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मुख्याधिकारीमार्फत हे निवेदन देण्यात आले. जर ही जाचक करवाढ रद्द न केल्यास वणीकरांसह मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
नुकतीच वणी नगरपालिकेने नवीन मालमत्ता कर आकारणी लागू केली असून, ही आकारणी गेल्या कराच्या दुप्पट आहे. या नवीन कराबाबतच्या नोटिसा वणीकरांच्या घरी पोहोचू लागल्या आहेत. मात्र, या करवाढीचा कोणताही ठराव घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आकारणी पुढील चार वर्षांसाठी लागू करण्यात आली असून, यामुळे वणीकरांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे ही करवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नगरपालिकेची हुकुमशाहीकडे वाटचाल – संजय खाडे
आधीच वीज बील, महागाई याने सर्वसामान्य त्रस्त आहे. त्यातच पालिकेने ही जाचक करवाढ केली आहे. करवाढ करण्यासाठी कोणतीही समिती अस्तित्वात नाही. याबाबत कोणताही ठराव झाला नाही. अधिकारी हे हुकुमशाही पद्धतीने निर्णय घेत आहे. त्यामुळे ही करवाढ अवैध असून वणीकरांना कोणाताही आर्थिक फटका बसू दिला जाणार.
वणी शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून, त्यात डबके साचत आहेत. तसेच अनेक ठिकाणी पावसामुळे झाडे-डुडपे वाढली असून, साफसफाईकडे पालिकेचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप करत निवेदनात पालिका प्रशासनावर निशाणा साधण्यात आला.
या वेळी अशोक चिकटे, प्रफुल्ल उपरे, रामदास कुचनकर, संदीप कांबळे, रवी कोटावर, राजू डवरे, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रेमनाथ मंगाम, कैलास पचारे, सुधीर खंडाळकर, कैसर पटेल, ओम ठाकूर, विकेश पानघाटे, अशोक पांडे, राजू अंकितवार, गणेश बोंडे, तोशीब अहमद, सुमित डवरे, विनीत तोडकर, संजय शेंडे आणि नरेंद्र काटोके यांच्यासह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.